Thursday, 16 April 2015

कावळे

कावळे
front-page.gif (313426 bytes)
"का बरं, आज बोलत नाहीस?"
इतका वेळ आवरून धरलेले अश्रू आता बांध फुटल्यासारखे अविरत वाहू लागले. हुंदक्यावर हुंदके येऊ लागले. मालतीबाईंची ती अवस्था पाहून यशवंतराव मुकाटयाने जवळच्या खुर्चीवर टेकले.
नेहमीचाच प्रकार झाला होता एकूण! यशवंतरावांनी दीर्घ सुस्कारा सोडला. "काय झालं आज?" त्यांनी विचारले. "आज अमोलला नेहमीसारखा शेजारून आणला होता." हुंदके आवरण्याचा प्रयत्न करत मालतीबाई म्हणाल्या, "तो इथेच झोपला म्हणून त्याला घेऊन जा म्हणून त्याच्या आईला सांगायला गेले."
"तर त्या काहीतरी म्हणाल्या. हो ना? पण तू आणतेसच कशाला लोकांची मुलं?" मालतीबाईंचा चेहरा केविलवाणा झाला.
"घर खायला येतं हो एकटीला," त्या ओशाळलेल्या आवाजात पुटपुटल्या.
यशवंतरावाना मालतीबाईंचा तो केविलवाणा चेहरा बघवेना.
"बरं. मग तू अमोलच्या आईकडे गेलीस; मग काय म्हणाली त्याची आई?"


"ती बापडी काही सुद्धा म्हणत नाही. हो, उलट 'तुम्ही अमोलला संभाळता म्हणून माझी कामे तरी उरकतात' असं म्हणत असते."
"बरं, मग आज काय झालं?"
"तिची सासू आली आहे गावाहून. खूप बोलत होती तिला. म्हणाली, सारखा अमोल आपला तिच्याकडे. वांझोटी नजर कशी असते कळू नये तुला? आणि शुक्रवारची सवाष्णही तिलाच घातलीस म्हणे. बाकी कुणी लेकुरवाळी मिळाली नाही का तुला?"

"आणि मग?"
"मग तरातरा येऊन घेऊन गेली अमोलला आणि आत्ता संध्याकाळी मोठयाने म्हणत होती, 'बघ आज पोर सारखा रडरड करतोय. तरी मी म्हणत होते ... "
मालतीबाईंना पुन्हा हुंदका फुटला.
एखाद्या जखमेला पुन्हा पुन्हा धक्का लागावा आणि जीवघेण्या कळांनी जीव व्याकूळ व्हावा अशी त्यांची अवस्था झाली होती.
कळवळून मालतीबाई म्हणत होत्या, "पोटी पोर नाही हे दु:ख कसंबसं सोसते मी. पण ह्या सगळयांच्या डागण्या सोसत नाही हो."
यशवंतराव हताश होऊन बसले होते. बायकोचे दु:ख त्यांना कळत होते. अपत्यहीनतेचे दु:ख तर तेही भोगत होते. पण त्यांच्या पुरुषी जगात न येणार्‍या या प्रश्नावरचा उपाय मात्र सापडत नव्हता.

"काय गर्दी जमली आहे पाहिलीत का? कुणी मूल टाकलयं म्हणे हो."
मालतीबाई म्हणत होत्या.
समोरच्या कचर्‍याच्या पेटीभोवती ही गर्दी जमली होती. पोलीस आले होते.
"हो का? असेल काहीतरी," पेपर वाचता वाचता यशवंतराव म्हणाले.
पण मालतीबाईंचा जीव रहात नव्हता.
उकिरडयावर पडलेले, असहाय्यतेने रडणारे ते चिमुकले बालक मन:चक्षूंसमोर येऊन त्यांचा जीव कळवळत होता.
शेवटी न राहवून त्या हळूच उठल्या. गर्दीत एका बाजूला उभ्या राहून बघू लागल्या.
कसल्या तरी पटकुरात गुंडाळलेला तो लालसर जीव निपचित पडला होता. त्याच्याकडे पाहता पाहता एक विलक्षण ओढ मालतीबाईंच्या हृदयात जागी झाली.
अपत्याविना तळमळणार्‍या त्या स्वत: आणि कुणा हतभागी मातेने टाकून दिलेले ते दुर्भागी लेकरू ---
कसला तरी निश्चय करून त्या घराकडे परतल्या.
मालतीबाईंनी एकदा निश्चय केल्यावर यशवंतरावांचे मन वळवण्यापासून ते चिमुकल्या प्रकाशला आपला म्हणून घरी आणण्यापर्यंत सारी चक्रे भराभरा फिरली. उजाड घरात पहिल्यांदाच मुलाच्या रडण्याचा-हसण्याचा आवाज आला. अंधार्‍या घरात प्रकाश आला.
मालतीबाईंच्या मनात आता वेगळीच आशा उत्पन्न झाली. प्रकाशमुळे त्या आता आई झाल्या होत्या. पण समाजाने आपल्याला पुत्रवती म्हणून ओळखावे, वांझपणाचा कलंक धुवून टाकावा अशी ओढ त्यांना लागली.
पण वर्षानुवर्षे त्यांना ओळखणार्‍या इथल्या शेजारात कसे शक्य होते ते?
मालतीबाईंनी यशवंतरावांपाशी हट्ट घेतला. - आपण बेळगावहून कुठेतरी लांब बदली करून घेऊ या.
मुंबईला बदली झाली आणि एका छोटयाशा फ्लॅटमध्ये बिर्‍हाड थाटले. शेजार चांगला होता. प्रकाश काकू, मामीचे नाते जोडत आसपासच्या घरांतून दुडदुडू लागला. मालतीबाईंना नवी पदवी मिळाली. - "प्रकाशच्या आई". मालतीबाईंना धन्यधन्य झाले. जीवनात सुखाला जणू भरती आली होती.
हळूहळू प्रकाश मोठा झाला. शाळेत जाऊ लागला. मित्रांत रमला. आईच्या पदरापासून दूर झाला. ते नैसर्गिकच होते. मालतीबाईंना त्याचेही कौतुकच होते.
खरे म्हणजे, 'आणि ते सारे सुखाने राहिले!' असे म्हणून त्या सुखी कुटुंबाची कहाणी इथे संपायला हवी होती.
पण तसे झाले नाही. कहाणी खरी इथेच सुरु झाली.

दहा वर्षाच्या प्रकाशची टेबलाशी काहीतरी खुडबूड चालली होती. मालतीबाईंनी पदराला हात पुसत घडयाळाकडे नजर टाकली. त्या म्हणाल्या, "प्रकाश, नीघ रे. शाळेची वेळ झाली." "हं." प्रकाशने मुकाटयाने खुंटीवरचे दप्तर गळयात अडकवले. आईने हातात दिलेला डबा घेतला; आणि तो निघाला.
त्याचे पाय जड पडत होते.
"प्रकाश!" आईने हाक मारली. प्रकाश थबकला.
"बर नाही का रे बाळा? चेहरा का उतरलेला दिसतोय?"
प्रकाशने गळयाशी दाटून आलेला हुंदका परतवला. आईच्या कमरेला मिठी घालण्यासाठी पुढे होणार्‍या हातांच्या मुठी घट्ट वळल्या.
आईला काही-काही सांगणार नव्हता तो. लुच्चे होते आई-बाबा. लुच्चे, खोटारडे.
नकारार्थी मान हलवून प्रकाश आईकडे पाठ फिरवून चालू लागला.
मालतीबाई त्याच्या पाठमोर्‍या आकृतीकडे काळजीयुक्त नजरेने पहात होत्या.
शाळा दिसू लागली तसे प्रकाशचे पाय लटपटू लागले. डोळे भरून येऊ लागले. तोंड रडवेले झाले.
शाळेच्या फाटकाशी त्याच्यासाठी टपून उभा असलेला घोळका डोळयापुढे दिसू लागला.
अगदी पहिल्यांदा असा घोळका फाटकाशी जमलेला दिसला तेव्हा कुतुहलाने प्रकाश तिकडे वळला होता. लालू घोळक्याच्या मध्यभागी होता. भोवती जमलेल्या मुलांना काहीतरी सांगत होता.
प्रकाशला पाहताच लालूने आरोळी ठोकली होती, "आला रे आला."
'कचर्‍याच्या पेटीतून' बरोबरच्या घोळक्याने कोरस धरला होता.
ती पोरे जे ओरडत होती त्याचा अर्थ त्यांना कळत नव्हता. ती सारी अक्कल होती लालूची. दहा-अकरा वर्षांच्या मुलांच्या ह्या वर्गात दोन वेळा आपटया खाल्लेला चौदा-पंधरा वर्षांचा लालू दादा होता.
त्यानेच सार्‍या घोळक्याला एकत्र करून ही बातमी ऐकवली होती.
"अरे, प्रकाश त्याच्या आईबापाचा नाही म्हणे."
"मग?"
"अरे, कचर्‍याच्या पेटीत सापडला म्हणे तो!"
"कचर्‍याच्या पेटीत? तिथे कसा गेला तो?"
मोठया शहाणपणाचा आव आणून लालू उत्तरला, "बिन बापाची पोरं टाकतात तिथं."
बाकीच्या मुलांना काही कळलां नाही. पण लालूच्या सुरात सूर मिळवीत ते म्हणू लागले, "प्रकाश बिन बापाचा"
प्रकाश ग्राऊंडवर गोटया खेळण्यात दंग होता.
त्याला ह्या सार्‍याची काहीच कल्पना नव्हती. मुलांच्या त्या घोळक्यातून बाजूला होऊन मधू हळूच प्रकाशकडे गेला. मधू प्रकाशचा दोस्त होता. हळूच प्रकाशच्या खांद्यावर हात ठेवीत तो म्हणाला, "प्रकाश ते काय म्हणताहेत ते खरं आहे?"
"काय म्हणताहेत?" प्रकाशने विचारले.
तोच लालूच्या पाठोपाठ सारा घोळका त्यांच्याभोवती जमा झाला. पोरे ओरडत होती, "प्रकाश बिन बापाचा. कचर्‍याच्या पेटीत सापडला."
लालूने पुढे होऊन प्रकाशच्या शर्टाची बाही खेचत म्हटले,
"ती बघ कचर्‍याच्या पेटीतली घाण लागलीय."
"प्रकाश, सांग ना रे खोटं आहे म्हणून." मधू काकुळतीनं म्हणाला.
प्रकाशने लालूकडे पाहिले. लालूचे डोळे क्रूरपणे लखलखत होते.
प्रकाशच्या मनात चीड उफाळून आली.
"खोटं बोलतोस साल्या," तो ओरडला आणि लालूच्या अंगावर धावून गेला.
'घण, घण-घण' - सार्‍या वादाचा शेवट करणारी घंटा वाजली आणि सारी पोरे तोकडे पळाली.
स्वयंपाकात मग्न असलेल्या आईला प्रकाश हळूच विचारीत होता, "आई, बाळं कुठून यतात गं?"
"हॉस्पिटलातून. का रे?"
"मी पण हॉस्पिटलातून आलो?"
"हो, का रे?"
"मग मुलं असं का म्हणतात?"
"काय म्हणतात?" आईने हातातले काम थांबवत म्हटले.
"मुलं म्हणतात मी कचर्‍याच्या पेटीत होतो."
मालतीबाईंच्या काळजाचा ठोका चुकला. आज दहा वर्षे प्रकाशपासून लपलेले गुपित त्याला कळले होते की काय?
मालतीबाईंनी लगबगीने उठून हात धुतले.
प्रकाशच्या पाठीवर हात फिरवीत त्या म्हणाल्या, "वेडपट आहेत ती मुलं. मुलं हॉस्पिटलधूनच येतात. तसाच तुला आणला आम्ही."
"मी तुमचाच आहे मग?"
"हो तर. आमचाच आहेस."
प्रकाशने समाधानाने आईच्या कुशीत तोंड लपवले.
रात्री मालतीबाई यशवंतरावाना सारी हकिगत सांगून काळजीने म्हणाल्या, "काय करावं मला प्रश्नच पडलाय."
यशवंतराव म्हणाले, "तू उगीच काळजी करतेस. आज नक्कीच त्याची समजूत पटली असेल. त्यातून पुन्हा विचारलन तर बघूया. लहान आहे. त्याला काय समजतय अजून!"
मालतीबाई आणि यशवंतराव यांच्या दृष्टीने प्रश्न तात्पुरता मिटला होता.
पण प्रश्न खरोखरचा मिटला होता का?

"लाल्या, तू खोटं बोलतोस. चल मारामारी कर," प्रकाश ओरडत होता.
"चल. पण खोटं बोलत नाही मी. तू बिन आई-बापाचा आहेस. तुझ्या आई-बापानी पाळलाय तुला."
"खोटं. कोण म्हणतं?" प्रकाशने लालूच्या अंगावर झेप घेतली.
लालूने सहज दिलेल्या ठोशाने प्रकाश लांब धुळीत फेकला गेला. त्याच्याकडे तुच्छतेने पहात लालू म्हणाला, "आमच्याकडे नवीन सानेकाकू रहायला आल्यात, त्यांनी माझ्या आईला सांगितलं. तुमच्या शेजारी बेळगावला रहात होत्या त्या. आमच्या सगळया आळीला माहित आहे, कुणालाही विचार."
प्रकाशचे शिवशिवणारे हात थंड पडले. भोवताली "बू, बू" करीत नाचणार्‍या मुलांचा आवाज त्याला ऐकू येईना.
डोक्यात शब्द घुमत होते - "आईनं मला खोटं सांगितलं, आई खोटारडी."
हातांनी कान झाकून घेत प्रकाश पळत सुटला. पोरांपासून, शाळेपासून दूर दूर. घरापासून, आईपासून, दूर दूर.
आईवरच्या अढळ विश्वासाला कुठेतरी तडा गेला जोता.

"अहो, प्रकाश हल्ली शाळेत रोज जात नाही. कुठे भटकतो कुणास ठाऊक. हल्ली नीट बोलतही नाही, नीट जेवतही नाही." मालतीबाई यशवंतरावाना सांगत होत्या, "एकदा त्याच्या शाळेत तरी चौकशी करा. एकदा विचारून बघा त्याला."
रात्री यशवंतरावांनी प्रकाशला समोर उभा केला.
"प्रकाश, तू हल्ली शाळेत जात नाहीस नेमानं?"
प्रकाशने नकारार्थी मान हलवली. "का रे?"
पण प्रकाशने ओठ घट्ट मिटून घेतले. तो बोलणार नव्हता. आईने त्याला खोटे सांगितले होते. आई-बाबा खोटारडे होते.
"तुझी तब्बेत बरोबर आहे ना?" उत्तर नाही.
"अभ्यास कठीण वाटतो का?" प्रकाश गप्पच.
"बोल ना काटर्या" तोल जाऊन यशवंतराव ओरडले आणि त्यांनी हात उगारला.
मालतीबाई पुढे धावल्या. प्रकाशला पाठीशी घालीत म्हणाल्या, "काय हे! कधी नाही तो पोराच्या अंगावर हात उगारायचा!"
प्रकाश मागच्या मागे दारातून बाहेर पडला होता. पण मालतीबाईंचे लक्ष त्याच्याकडे नव्हते. त्या म्हणत होत्या, " इतकं सोसल्यावर देवानं हे मूल दिलं. आणि आज त्याच्यावर हात उगारलात!"
ओशाळल्या आवाजात यशवंतराव म्हणाले, "रागाच्या भरात भानच राहिलं नाही. तो काही उत्तरच देईना."
"अहो, पण जरा समजुतीनं घ्यायचं. आता बघा घाबरून, रुसून निघून गेला. जरा बघून घेऊन तरी या."
"कुठे गेला असेल?"
"मधूकडे असेल. त्याचा मित्र आहे तो."

"अरे मधू, आमचा प्रकाश तुमच्याकडे आलाय?"
"नाही."
"काय रे, हल्ली प्रकाश शाळेत येत नाही रोज?"
"नाही."
"का रे?"
"शाळेत पोरं त्याला त्रास देतात. बिनबापाचा म्हणतात."
"बिनपापाचा?" यशवंतरावांचे हृदय क्षणभर धडधडले.
"कुणी सांगितलं त्याला?" त्यांनी विचारले.
"लालूच्या गल्लीत सानेकाकू आहेत, त्यांनी. बेळगावला तुमच्या शेजारी होत्या म्हणे त्या. सगळयांना माहित आहे म्हणे.""
यशवंतरावांचे शरीर क्रोधाने कापू लागले.
"ते खरं नाही ना हो काका?" मधू भीत भीत विचारत होता.
त्याला उत्तर न देता यशवंतराव मागे फिरले. प्रकाशला शोधून घरी न्यायचे आहे ह्याचे भान त्यांना त्यांना उरले नाही. पावले सवयीने एकापुढे एक पडत होती. शरीर थरथरत होते. मुठी त्वेषाने वळल्या होत्या.
घर नजरेस पडले आणि यशवंतरावांचे पाय थांबले. कापणार्‍या ओठांनी ते म्हणाले,
"कावळे! कावळे आहेत सारे. दुसर्‍याचा व्रण पाहून त्यावर टोचा मारणारे. काव काव करून इतरांना बोलावणारे. आम्हाला मूल नव्हतं तेव्हा सार्‍या बायकांनी हिला टोचून खाल्लं. हा मिळाला तेव्हा बोभाटा नको म्हणून इथं निघून आले. पण इथेही .... आता त्या आईला काय सांगू?"
आणि तो शोकसंतापाचा आवेग सहन न होऊन यशवंतरावांच्या डोळयातून घळघळा पाणी वाहू लागले.
खिडकीशी उभ्या राहून अंधाराकडे डोळे ताणून मालतीबाई बाहेरच्या अंधारात बाप-लेकांच्या आकृतीचा शोध घेऊ पहात होत्या.
अंधार्‍या गॅलरीच्या गार भिंतीला डोके टेकवून प्रकाश शून्य नजरेने कुठेतरी पहात होता.
व्रण शोधणार्‍या धारदार चोचींनी एक चिमुकले घरटे विस्कळीत करून टाकले होते.

No comments:

Post a Comment