Friday 13 March 2015

कोणी कोणावर प्रेम करावं? आणि किती.. हे ठरलेलं आहे..

कोणी कोणावर प्रेम करावं? आणि किती.. हे ठरलेलं आहे..
पहिल्या पावसाने दरवळावा आसमंत..
वार्‍यासोबत वाहत यावा आंब्याचा सुगंध..
नदीच्या शरीरात खोल घुसत जावेत भोवरे..
इतकं सहज प्रेम नाही होत माणसांच्या जगात..
जातीपातीच्या.. परिस्थितीच्या.. पैशाच्या.. रंगाच्या..
अनेक भिंती आहेत इथे..
आणि काही लक्ष्मणरेषा..
कधीच ओलांडू नयेत अशा..
ओलांडल्या तर जगबुडी होईल अशा..
कोणी कोणावर प्रेम करावं? आणि किती.. हे ठरलेलं आहे..
प्रेम म्हणजे नक्की काय हे बहुतेकांना माहित नसलं तरीही..
स्वतःच्या स्वतःला लागलेल्या शोधाला कोणी प्रेम मानलं तरीही..
आणि कोणाला सगळ्या व्याख्यांपलीकडे जाऊन प्रेम करता आलं तरीही..
कोणी कोणावर प्रेम करावं? आणि किती.. हे ठरलेलं आहे..
कोणी कोणाला स्पर्श करावा? आणि किती.. हे ठरलेलं आहे..
स्पर्श न करता भेट द्यावी,
की निरागस उत्कटतेने मिठी मारावी...
कोणती माणसं उंबर्‍याबाहेर ठेवावी,
आणि स्वार्थासाठी कोणाची साथ द्यावी हे ठरलेलं आहे..
कोणी कोणाला स्पर्श करावा? आणि किती.. हे ठरलेलं आहे..
पण कोणाच्या आत्म्याला कोणाचा स्पर्श व्हावा याचे काही नियम नाहीत..
कोणाची आयुष्य किती गुंतावी एकमेकांच्यात याचे काही शास्त्र नाही..
किती भावविश्वं विरघळावी एकत्र यावर काही बंधनं नाहीत..
कोणी कोणावर प्रेम करावं? आणि किती.. हे ठरलेलं आहे..
ठरलेले आहेत जगाचे नियम..
प्रत्येकासाठी वेगवेगळे..
आणि तरी प्रत्येकालाच अपरिहार्यपणे सलणारे..
सुखासाठी हावरेपणा केला की दु:ख मिळतं..
पण सुखाच्या प्रतिक्षेत अबोल आयुष्य काढलं तरी कोणाला समजतं..?
जिथे वास्तवाच्या वाट्याला क्वचितच येणारी सुखं,
फक्त स्वप्नांतच भेटतात..
आणि स्वप्नांतली सुखं खर्‍या आयुष्यात मोजायची का हे कोणालाच माहीत नसतं..
काही चुका त्यांच्या शिक्षा घेऊनच येतात..
पण चुकीच्या प्रमाणातच शिक्षा व्हावी याचं उत्तरयायित्व कोणाचंच नसतं..
मग कधी मोजावं लागतं आयुष्य..
कधी अनेक आयुष्यं..
कधी अनेक पिढ्या..
तरी ठरलेले आहेत जगाचे नियम..
जगाच्या भल्यासाठी केलेले नियम..
अमानुष निर्दयतेने पाळले जाणारे नियम..
कोणी कोणावर कसं आणि किती प्रेम करावं याचे नियम..
कोणी कोणावर प्रेम करावं? आणि किती.. हे ठरलेलं आहे..
कोणी कोणावर प्रेम करावं? आणि किती.. हे ठरलेलं आहे..

No comments:

Post a Comment