Saturday 28 March 2015

वाघ आणि ब्राह्मण
एका अरण्यात एक वाघ राहात होता. काही दिवसांनी तो म्हातारा झाला. अरण्यात धावपळ करून शिकार करणे त्याला जमेना. आता खायचे काय? जगायचे कसे? याचा तो विचार करू लागला. विचार करता करता त्याला एक नामी युक्ती सुचली. त्याने त्याच्या काठावर उगवलेले दर्भ घेतले. त्याचे कडे तयार केले. मग ते कडे हातात घेऊन तळ्याच्या काठावर बसला तेथून जाणार्या वाटसरूंना उद्देशून तो म्हणाला, ''हे वाटसरूंनो, मी दानधर्म करीत आहे. हे सोन्याचे कंकण मी दान करती आहे. ज्याला हवे असेल त्यांने माझ्याजवळ येऊन हे घ्यावे.

त्या तळ्याजवळून एक दरिद्री ब्राह्मण जात होता. वाघाचे ते शब्द ऐकून त्याला लोभ सुटला. तो स्वत:शी म्हणाला, ''अरे वा! आज माझं दैव फळास आलं! आज आपल्याला सोन्याचे कंकण मिळणार! आपले जन्माचे दारिद्य्र जाणार! अरे हो! पण हे दान करणारा वाघ आहे! कंकणाच्या लोभाने आपण त्याच्याजवळ गेलो आणि त्याने आपल्यावर झडप घातली तर? तेव्हा नकोच या भागनगडीत पडायला. येथें मोठा धोका दिसतो. पण धन मिळवावयाचे म्हणजे त्यात थोडाफार धोका असणारच. कुणीतरी म्हटलंच आहे, ''संकटांना तोंड दिल्याशिवाय माणसाला कधीही मिळत नाही. तेव्हा पाहूया तरी हा काय म्हणतो ते.''

असा विचार करून तो ब्राह्मण त्या वाघाला म्हणाला, ''अरे, कुठं आहे तुझं ते कंकण?'' वाघाने आपल्या हातातील कंकण दाखविले. तेव्हा ब्राह्मण म्हणाला, ''अरे, तू आहेस वाघ! हिंस्त्र प्राणी ! तुझ्या बोलण्यावर मी विश्वास कसा ठेवू ?''

वाघ म्हणाला, ''अरे एके काळी मी हिंस्त्र होतो हे अगदी खरं, पण आता नाही बरं! अरे, जेव्हा तरुण होतो तेव्हा मी फार क्रूर, दुष्ट होतो. त्या वेळी मी अनेक गाई मनुष्य यांचा वध केला. पण काय सांगू, त्या माझ्या क्रूर कर्मामुळे मला शाप मिळाला. माझी बायकोमुले मेली. माझा अगदी निर्वंश झाला. अतिशय दु: झालेला मी माझ्या धर्मगुरूंना शरण गेलो. तेव्हा ते म्हणाले, 'पूर्वी केलेल्या पातकातून मुक्त होण्यासाठी तू दानधर्म कर.' तेव्हापासून मी स्नानसंध्या, दानधर्म यातच काळ घालवितो. शिवाय आता मी अगदी म्हातारा झाला आहे. माझी नखे आणि दात ही गळून पडले आहेत. मग माझ्यावर तू विश्वास का बरे ठेवत नाहीस?

माझ्याजवळ हे सोन्याचे कंकण आहे. पण मला आता कशाचाच लोभ राहिलेला नही. मला हे दान म्हणून द्यावयाचे आहे. वाघ माणसाला खातो हे अगदी खरे,पण मी आता तो पूर्वीचा वाघ राहिलो नाही. मी परमार्थामार्गाला लागलो आहे. हिंसा हे महापाप आहे. दानासारखे पुण्य नाही हे मला पूर्ण पटले आहे. शिवाय तू अगदी गरीब, दरिद्री दिसतोस. गरिबाला, सत्पात्र माणसाला दान करावे अशी धर्माची शिकवण आहे. म्हणून हे कंकण घेण्यास तूच पात्र आहेस. तेव्हा कोणताही विचार करता या तळ्यात स्नान कर हे सोन्याचे कंकण घे.''

वाघाचे हे प्रवचन ऐकून त्या ब्राह्मणाला विश्वास वाटला. तो स्नान करण्यासाठी त्या तळ्यात शिरला आणि त्यातील चिखलात अडकून पडला. ब्राह्मणाची ती अवस्था पाहून वाघ म्हणाला - ''अरेरे, तू चिखलात अडकलास वाटतं! थांब हं! मी तुला वर काढतो'' असे म्हणून त्या वाघाने त्या ब्राह्मणावर झडप घातली त्याला ठार मारून खाऊन टाकले.

कुणीतरी म्हटलंच आहे, 'लोभाच्या आहारी जाऊन कुणावरीही एकदम विश्वास ठेवू नये.' दुष्ट मनुष्याने धर्मशास्त्र पालन केले असले, वेदांचे अध्ययन केले असले तरी तेवढ्यावरून त्याच्यावर विश्वास ठेवू नये. कारण मूळ स्वभाव बदलत नाही. ज्याचे कुलशील, स्वभाव माहीत नही अशा माणसावर विश्वास ठेवला तर ब्राह्मणासारखी अवस्था होते.



No comments:

Post a Comment