Saturday 28 March 2015

पोगो...
एके दिवशी खूप पाऊस पडत होता.
घरात बसून पिंकीला अगदीच कंटाळा आला होता.
दादाबरोबर सापशिडी खेळून झाली. पाऊस पडतच होता.
पत्त्यांचा बंगला बांधून झाला.
पाऊस पडतच होता.
थोडा वेळ टीव्हीवर कार्टूनपण बघून झालं. तरीपण पाऊस पडतच होता.
आता काय करावं बरं..?
िपकी विचारात पडली.
बाहेर खेळायला पण जाता येत नव्हतं. पाऊस अगदीच जोरात पडत होता.
‘‘
आई, कंटाळा आलाय.’’
‘‘
आबा, मला कंटाळा आला.’’ तिने घरातल्यांच्यामागे भुणभूण सुरू केली.

इतक्यात घराचं दार वाजलं.
कोण आलं असेल बरं?
आईने दार उघडलं.
कोणीच नव्हतं.
थोडा वेळ झाला. दार परत वाजलं.
आईने दार उघडलं. आत्ताही कुणीच नव्हतं.
पुन्हा थोडय़ा वेळाने दार वाजलं. आजोबा म्हणाले, ‘‘थांब. आता मीच बघतो. कोण खोडय़ा काढतंय ते.’’
पिंकीही गेली आजोबांबरोबर.
त्यांनी दार उघडलं. परत कोणीच नव्हतं.
दार बंद केलं आणि इतक्यात ते परत वाजलं.
छोटी पिंकी आजोबांबरोबरच होती.
अचानक तिचं लक्ष खाली गेलं.
‘‘
आबा, हे बघा काय?’’
आबांनी खाली पाहिलं तर दाराबाहेर एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू आडोसा घेऊन उभं होतं.
बिचारं पावसात चांगलंच भिजलं होतं. थंडीने अगदी कुडकुडत होतं.
कुं. कुं. कुं. आवाज करत त्यानं केविलवाण्या नजरेनं पिंकीकडे पाहिलं.
काळ्याभोर डोळ्यांचं, चॉकलेटी रंगांचं हे गुबगुबीत पिल्लू पिंकीला आवडलं. तिनं चटकन त्याला उचलून जवळ घेतलं.
‘‘
अरे, अरे, भिजलास? तुला थंडी वाजते?’’ पिंकीने त्याच्याशी गप्पा मारायला सुरुवात केली.
पिंकीने जवळ घेतल्याने पिल्लू खूष झालं. ते पटकन तिला चिकटलं. तिच्या हातांना प्रेमानं चाटायला लागलं.
‘‘
अगं, सोड त्याला. घरात येईल. पायाला चिखल आहे त्याच्या. सोडून दे.’’ आई ओरडली.
‘‘
आई, नको ना. ते भिजलंय. बघ कसं माझ्या हातांवर बसलंय. घेऊया ना त्याला घरात थोडा वेळ.’’
‘‘नको.’’
‘‘
घेऊया ना आई.’’
‘‘
नाही. अजिबात नाही.’’
‘‘
असू दे गं. पोर कंटाळलीय. खेळू दे थोडा वेळ त्याच्याशी.’’ आजोबांनी पिंकीची बाजू घेतली.
पिंकीने पटकन त्याला आत घेतलं.
कुडकुडणारं पिल्लू आता पिंकीला चिकटलं.
आबांनी तिला पोतं दिलं. जुन्या कपडय़ांचा गोल केला. अलगद त्याला पोत्यावर ठेवलं.
शांतपणे त्याच्या पाठीवरून हात फिरवला.
पिंकीने जवळची गोळी त्याला दिली. त्याने वास घेतला आणि तोंड फिरवलं.
ते अधिकच आबांना बिलगलं. आबा- ‘‘अगं, तो तुमच्यासारखी गोळी नाही खात. त्याला दूध दे.’’
पिंकी दूध आणायला स्वयंपाकघरात गेली. मागून आबा आले. ‘‘थांब, थोडं गरम दूध दे.’’ आबांनी पिंकीला गरम दूध करून दिलं. आई अजून नाराजच होती.
ताटलीतून दूध घेऊन पिंकी बाहेर आली. आता मात्र पिल्लाने मटामटा दूध पिऊन टाकलं.
शेपूट हलवत ते आनंदाने पिंकीभोवती उडय़ा मारू लागलं. आबा एका बाजूला बसून शांतपणे बघत होते.
पिंकीने तिची रिबीन घेतली आणि ते दोघेही रिबिनीशी खेळायला लागले.
इतक्यात आतल्या खोलीत बसलेला दादा पण आला.
‘‘
अरे, कुत्र्याचे पिल्लू!’’ दादाला भलताच आनंद झाला.
‘‘
पिल्लू.. छान आहे. याचं नाव काय?’’
पिल्लूही काहीशा कुतुहूलाने दादाकडेच पाहतं होतं.
‘‘नाव अजून ठेवायचंय.’’ - पिंकी.
‘‘
थांब गं. रिबिनीपेक्षा त्याच्याकडे चेंडू टाक.’’
दादाने खिशातला चेंडू पिल्लाकडे टाकला.
आता पिल्लू चेंडूशी खेळायला लागलं. चेंडूमागे जोरात धावायला लागलं.
‘‘
काय फास्ट धावतोय रॉकेटसारखा. याचं नाव रॉकेट.’’ - दादा.
‘‘
नाही. पोगो.’’
‘‘
पोगो? शी: हे काय नाव?’’
‘‘
ते माझं आवडतं कार्टून चॅनेल आहे म्हणून.’’
‘‘
रॉकेट.’’ ‘‘पोगो.’’ ‘‘रॉकेट.’’ ‘‘पोगो.’’ दोघं भांडायला लागले. एकमेकांवर चिडले.
‘‘
, भांडू नका. पिंकी, पाऊस कमी झाला की संध्याकाळी सोड त्याला बाहेर. त्याच्यावरून उगीच तुम्ही दोघं भांडू नका.’’ - आई. दोघेही आईजवळ स्वयंपाकघराच्या दारात गेले.
‘‘
आई, पिल्लू मला मिळालंय. त्याचं नाव मीच ठेवणार.’’ दादा गप्पच होता.
‘‘
ठीक आहे. पोगो तर पोगो.’’ - दादा
इतक्यात पिल्लूही त्याच्यामागे आलं. आईकडे बघून उत्साहाने शेपूट हलवायला लागलं. तिच्या पायात घोटाळायला लागलं.
अचानक पिल्लू पायात आल्याने आई गडबडली. तिच्या हातात कप होता. तो पडला आणि फुटला. ती चांगलीच चिडली.
त्याला म्हणाली, ‘‘ चल, बाजूला हो. मला कामं आहेत. हट्.’ आई चिडली.
बिच्चारं पिल्लू उदास झालं. दादाकडे आणि पिंकीकडे पाहू लागलं. दादाने त्याला हलकेच उचललं. बाहेर नेऊन ते परत पिल्लाशी खेळायला लागले.
‘‘
पोगो, हा बघ बॉल.’’ तिघे आंनदाने खेळत होते. आबा त्यांचा खेळ प्रेमाने बघत होते.
थोडय़ा वेळाने आईने साऱ्यांना जेवायला बोलावले.
पिंकीने पोगोची दुधाची ताटली घेतली. ‘‘पोगो ये ना.’’ - पिंकी. पिंकीमागे पोगो पळत आला. आईला बघितल्यावर आनंदाने शेपूट हलवायला लागला. तिच्या अंगावर उडय़ा मारायला लागला. तिच्या पायाशी घोटाळायला लागला.
आईने रागानेच त्याच्या ताटात पोळीचे तुकडे करून फेकले.
आईचा राग पाहून पिंकी, पोगो, दादा आश्चर्यचकित झाले.
बिच्चारा पोगो. गरीब चेहरा करून आईकडे पाहायला लागला.
आई आपली कामातच होती. पोगोने ताटातली पोळी हुंगल्यासारखी केली. पण खाल्ली नाही.
‘‘
आबा, तो खात नाहीये.’’
‘‘
आत्ता दूध प्यायला ना. भूक नसेल त्याला. तुम्ही जेवा नीट.’’ -आई
सगळे गप्पपणे जेवताहेत. चोरटय़ा नजरेने पोगोकडे पण बघताहेत. पोगो आईकडेच पाहतोय.
जेवून मुलं पुन्हा पोगोबरोबर खेळायला सुरुवात करताहेत.
दादा बॉल फेकतोय.
‘‘
जा पोगो, पळ. पकड.’’
पिंकी पण मजा पाहतेय. पोगो पणवौ वौअसा प्रेमळ आवाज करतोय.
‘‘
चला रे, किती आवाज करताय. आबांना झोपू दे.’’ - आई पुन्हा रागावली.
‘‘
असू दे . खेळू दे त्यांना. अरे आवाज नका करू.’’ - आबा.
‘‘
चल पिंकी, मी तुला पत्त्यांचा बंगला करून दाखवतो. मोठ्ठा सहा मजली.’’ -दादा.
‘‘
चालेल.’’
पिंकीने पोगोसाठी केलेल्या जुन्या कपडय़ांची गादी उचलली. दादाने पोगोला उचलून घेतलं. तिघे आत आले.
दादा पत्त्यांचा बंगला बांधतोय. छोटा बंगला तयार होतोय. पिंकी प्रेमाने बघतेय. इतक्यात पोगो जागेवरून उठला आणि बंगला हुंगायला लागला.
बंगला पटकन पडला.
‘‘
अरेऽऽऽ - दादा.’’
दादाने हसतच पोगोला हलकीच चापट मारली.
पोगो पळत पळत पिंकीजवळ गेला. पोगोच्या चेहऱ्यावर भाव. कशी मज्जा केली.. पिंकीने मजेने हसतेय. तिने पटकन पोगोला जवळ घेतलं. प्रेमाने अंथरुणावर ठेवलं. ती त्याच्या पाठीवरून हात फिरवायला लागली. आता पोगो खाली बसला. त्याने हलकेच त्याचं डोकं जमिनीला लावलं. तो झोपायला लागला. पिंकी त्याला थोपटायला लागली.
पोगो झोपला. अगदी गाढ झोपला.
दोघेही परत पत्त्याचा बंगला बांधायला लागले. दुपार सरली.
‘‘
चहा घेता का रे थोडा.’’ - आबा.
‘‘
हो.’’ - दोघेही.
आईने तिघांनाही चहा दिला.
‘‘
आता पाऊस कमी झाला की, सोडा त्या पोगोला.’’ - आई.
‘‘
नको ना आई. किती छान आहे पिल्लू.’’ - पिंकी.
‘‘
अजिबात नाही.’’ - आई.
‘‘
असू दे ना आई.’’ - दादा. आजोबा सगळ्यांकडे बघत होते.
इतक्यात बाबा आले. ‘‘काय गडबड आहे?’’ -बाबा.
‘‘
बाबा बाबा, आई बघा ना पोगोला सोडा म्हणतेय. पावसात कुठे जाणार तो? कशाला सोडा? असू दे ना आपल्याकडेच.’’ - पिंकी.
‘‘
बाबा, सांगा ना तुम्हीच आईला.’’ - दादा.
पिंकी आणि दादा काय सांगत आहेत ते बाबांना काही कळेना.
आई- ‘‘कुठलं तरी एक कुत्र्याचं पिल्लू आणलंय घरी. थोडा वेळ ठेवा म्हटलं तर आता घरातच ठेवूया म्हणून कटकट करताहेत.’’
‘‘
अरे, मला जरा बसू दे. चहा घेतो मग ठरवू.’’ - बाबा.
आईने बाबांना चहा दिला आणि समोरच लोकरीचा गुंडा घेऊन विणत बसली.
आबा पेपर वाचत होते. पिंकी आणि दादा तिथेच बसले होते.
इतक्यात पोगो बाहेर आला.
‘‘
पोगो, झोप झाली का तुझी?’’ पिंकी पोगोकडे धावली.
‘‘
अगं पडशील. हळू.’’ - आई पिंकीला असं सांगतेय तोपर्यंत आईच्या मांडीवरचा लोकरीचा गुंडा पडला आणि घरंगळत टेबलापर्यंत गेला. निळा-पिवळा रंगीत लोकरीचा गुंडा पोगोला भारीच आवडला. तो पटकन त्याच्याकडे धावला. त्याने गुंडा तोंडात घेतला आणि तो पिंकीकडे पाहायला लागला.
‘‘
अरे, आईचा आहे. सोड. टाकून दे. ती फटके देईल.’’ - पिंकी.
पोगोला जसं काही कळालंच. त्याने एकदा मिश्किल नजरेने पिंकीकडे पाहिलं आणि तो धावत धावत आईकडे गेला.
तिच्यापासून थोडं लांब उभं राहून चेहरा वर करून तो आईकडे पाहायला लागला. तोंडात लोकरीचा गुंडा धरून जोरजोरात शेपटी हलवणारा पोगो छान दिसत होता. त्याच्याकडे पाहून आईलाही हसायला आलं. तिने त्याच्या तोंडातून गुंडा काढून घेतला.
‘‘
आता बघ बरं तो पोळी खातोय का ते.’’ -आबा.
पिंकीने आत जाऊन मगाचीच ताटली आणली.
‘‘
खा पोगो. पोळी खा.’’
पोगोने ताटली हुंगली आणि मान फिरवली.
आता आई उठली. ताटली पुन्हा एकदा पोगोपुढे सरकावली. त्याच्या अंगावरून हात फिरवला.
पोटो चटकन पुढे आला. आईच्या अंगावर उडय़ा मारायला लागला. तिच्या पायाला चाटायला लागला. आईने पोगोला पोळी दिली. पोगो पोळी खायला लागला.
‘‘
बघ आई, तू ओरडलीस ना त्याला मगाशी म्हणून तो खात नव्हता. आई, राहू दे ना गं त्याला.’’ दादा अगदीच रडकुंडीला येऊन सांगायला लागला.
‘‘
अरे, त्याला सकाळ, संध्याकाळ रोज फिरायला न्यावं लागतं. सवयी लावाव्या लागतात. तुझी शाळा नाही का, कोण नेणार.’’ - आई.
‘‘
आई, मी सकाळी फिरायला नेईन.’’ - पिंकी.
‘‘
मी संध्याकाळी.’’ - दादा.
‘‘
अगं, त्याला मी लावीन सवयी. शिकवू आपण त्याला. लहान आहे पिल्लू. शिकेल हळूहळू.’’ - आबा.
एव्हाना पोगोची पोळी संपली होती. तो टकामका बाबांकडेच पाहत होता. हे कोण नवीन असा भाव त्याच्या चेहऱ्यावर.
आईने एकदा बाबांकडे पाहिलं. बाबा पिलाकडे पाहून हसताहेत.
‘‘
मी ही मदत करेन आबांना त्याला सवयी लावायला.’’ - बाबा.
‘‘
बरं, असू दे मग.’’ - आईने सांगितले.
पिंकी आणि दादा खूश झाले.
तो अंगणातच बसतो. अंगणातल्या चिमण्यांना पकडायचा प्रयत्न करतो आणि आईचा ओरडा खातो.
पिंकीकडून दूध पोळी खातो आणि तिचं दप्तर पळवतो.
दादाबरोबर बॉल खेळतो.
आजोबांबरोबर फिरायला जातो.
बाबांना रस्त्यापर्यंत सोडायला जातो.
पोगो आता त्यांच्या घरातलाच एक सदस्य झालाय.
ते सारेच आनंदात राहतात.

No comments:

Post a Comment